प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
संपूर्ण महाराष्ट्रात १४ जानेवारी हा दिवस 'मकर संक्रांत व भूगोल दिन' म्हणून मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतो. याच दिनाचा एक भाग म्हणून महावीर महाविद्यालय, कोल्हापूर नेहमीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी विविध प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करीत असते. त्यामुळे यावर्षी ही महावीर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने मा.कुलगुरू व मा. प्र- कुलगुरू यांना शुभेच्छा देऊन अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.
मकर संक्राती व भूगोल दिन म्हणजे ऋतू बदलण्याचा हा महत्त्वाचा दिवस होय हा दिवस सर्वत्र भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. देशपातळीवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूगोल विषय तज्ञ प्रोफेसर सी.डी. देशपांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सन १९८८ पासून भूगोल दिनाची सुरुवात झाली. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर भूगोल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच सूर्य मकर वृत्तावरून उत्तरेकडे सरकू लागतो त्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते म्हणून मकर संक्रांती सण या दिवशी साजरा केला जातो.याच दिनाची प्रेरणा घेऊन या महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य डॉ.अरुण पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी त्यांचे सहकारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये या दिनाच्या अनुषंगाने विविध विषयांना स्पर्श होणाऱ्या भित्तिपत्रकाचे उत्तम पद्धतीने सादरीकरण केले. त्याचबरोबर व्याख्यानाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे व करियरच्या नव-नवीन संधी माहित व्हाव्यात यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागातील डॉ.प्रशांत पाटील यांचे 'भूगोल विषयात असणाऱ्या करिअरच्या नवीन संधी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले. त्यांनी सद्यस्थितीत असणाऱ्या करिअरच्या वाटा याविषयी भाष्य केले. तसेच प्रो.डॉ. एस.के.पवार यांनी आपल्या व्याख्यानात' मकर संक्रांत व भूगोल दिनाचे' महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे प्राचार्य, डॉ.आर.पी.लोखंडे यांनी या निमित्ताने अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे कौतुक केले.
महावीर महाविद्यालयचे विद्यार्थी व प्राध्यापक यांनी शिवाजी विद्यापीठाचे मा.कुलगुरू प्रो.डॉ. डी. टी. शिर्के व मा.प्र-कुलगुरू प्रो.डॉ.पी.एस. पाटील यांची भेट घेऊन त्यांना मकर संक्रांत व भूगोल दिनाच्या निमित्ताने तिळगुळ व बुके देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ.शिर्के यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. पाटील यांनी ही विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाला भेट देऊन भूगोल विभाग प्रमुख प्रो.डॉ. संभाजी शिंदे यांना बुके व इतर प्राध्यापकांना गुलाब पुष्प देऊन त्यांनाही या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हे सर्व करण्या मागचा हेतु विद्यार्थी हिताय असा होता की, विद्यार्थ्यांनी मोठ्या विद्वान व उच्च पदस्थानी असणाऱ्या लोकांच्या सहवासात व संपर्कात येऊन अशाप्रकारचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी प्रगतीमय व सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी केलेला हा प्रयत्न होता.
हा अनोखा उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ.आर.पी.लोखंडे, भूगोल विभाग प्रमुख डॉ.अरुण पाटील, त्यांचे सहकारी डॉ.शशिकांत पाटील ,प्रा. रामदास तरुके,प्रा.राजेंद्र हिरुकडे, प्रा.स्नेहल करपे व भूगोल विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या प्रेरणादायी अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1 Comments
खूप छान कार्यक्रम आयोजित केल्या बदल व बातमी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
ReplyDelete