सोलापुरात दोघे रिटर्न झेडपी मेंबर ; दोघांच्या पत्नी, एकाची आई, एकाचा भाऊ आले निवडून


सोलापूर : तब्बल आठ वर्षाच्या गॅप नंतर झालेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चांगलीच गाजली. भाजपने एकहाती सत्ता मिळवली. अनेकांना पराभवाचा धक्का बसला. 2017 मध्ये जिल्हा परिषदेला निवडून आलेल्या 68 पैकी केवळ दोनच सदस्य पुन्हा एकदा सभागृहात आले आहेत. तर दोन सदस्यांच्या पत्नी आणि एकाचा भाऊ निवडून आला आहे.
जिल्हा परिषदेत सलग पाच वर्षे अर्थ व बांधकाम सभापती राहिलेले मोहोळचे विजयराज डोंगरे, आणि सांगोला तालुक्यातून अतुल पवार हे पुन्हा झेडपी सदस्य झाले आहेत.

2017 मध्ये विजयराज डोंगरे हे आघाडी करून निवडून आले होते. यंदा मात्र त्यांनी राजन पाटील हे भाजपमध्ये गेल्याने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आपल्या आष्टी गटातून ते विजयी झाले आहेत. या विजयाने त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

दुसरीकडे अतुल पवार हे 2017 मध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटातून निवडून आले होते यावेळी त्यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दिपक आबा साळुंखे यांच्या मुलाचा पराभव करत विजय मिळवला. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले होते.

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गटातून माजी पक्षनेते आनंद तानवडे यांना तीन अपत्याचा मुद्दा पुढे करत भाजपने उमेदवारी नाकारली. शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये म्हेत्रेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. आपल्या बंधू प्रवीण तानवडे यांना उमेदवारी घेत तिथून निवडून आणले. यामुळे वागदरी जिल्हा परिषद गटात तानवडे यांचे वर्चस्व अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.

दिवंगत माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांच्या पत्नी विमल खताळ या कामती जिल्हा परिषद गटातून भाजपतर्फे विजयी झाल्या आहेत. त्यांचे पती तानाजी खताळ हे 2017 मध्ये याच गटामध्ये विजयराज डोंगरे यांच्या आघाडीतून सदस्य होते. पण त्यांच्या मृत्य नंतर त्यांची मुलं राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर खताळ पुन्हा पतीच्या जागेवर सदस्य झाल्या आहेत. 

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन दराडे यांच्या ऐवजी त्यांची पत्नी भारती दराडे यांना उपले दुमाला गटातून उमेदवारी मिळाली त्यांनी या गटातून दणदणीत विजय मिळवला आहे. बार्शीत  राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी झाल्या आहेत.

माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना एकनाथ शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांचा हत्तूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला राखीव झाला होता. त्याठिकाणी त्यांनी आपल्या मातोश्री लक्ष्मीबाई रतीकांत पाटील यांना उमेदवारी घेत निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टीच्या उज्वला हवीनाळे या विरोधात होत्या, चुरशीची लढत होऊन केवळ 34 मतांनी लक्ष्मीबाई पाटील या विजयी झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments