बार्शी : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हे बार्शी तालुक्यातील गुळपोळी गावच्या कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कु. विद्या दत्तात्रय काळे हिची सोलापूर शहर महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. एका सामान्य कुटुंबातील लेकीने खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण केल्याने संपूर्ण गुळपोळी गावात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हलाखीच्या परिस्थितीतून यशाची भरारी विद्याचे वडील दत्तात्रय काळे हे अल्पभूधारक शेतकरी असून, संसाराला हातभार लावण्यासाठी छोटासा मंडप व्यवसाय करतात. तर आई वंदना काळे या स्वतः द्राक्ष विक्रीचे कष्टप्रद काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही या माऊलीने आणि पित्याने आपल्या लेकीच्या शिक्षणात आणि स्वप्नांत कधीही अडथळा येऊ दिला नाही. आपल्या आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिलेल्या विद्यानेही अभ्यासात आणि मैदानी चाचणीत कसून मेहनत घेतली आणि दुसऱ्याच प्रयत्नात १०८ गुण मिळवून हे दैदिप्यमान यश संपादन केले.
शिक्षण आणि यशाचा प्रवास
विद्याचे प्राथमिक शिक्षण गुळपोळी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले. तर 11 वी 12 वी अॅड दिलीपराव सोपल विद्यालय सुर्डी येथे पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी तिने बार्शीतील नामांकित शिवाजी कॉलेजमध्ये B.Sc. पूर्ण केले. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने बार्शीतील शौर्या करिअर अकॅडमी (अजित कोळी सर) आणि शिवराज फिजिकल अकॅडमी (विशाल कौलगे सर) यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली. ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.
"आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी 'खाकी'त"
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना विद्या म्हणाली, "माझ्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असतानाही आई-वडिलांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. आई द्राक्ष विकून कष्ट करायची आणि वडील शेतात राबायचे, त्यांचे हे कष्ट पाहूनच मला प्रेरणा मिळाली. आज मी जी खाकी वर्दी मिळवू शकले, त्याचं पूर्ण श्रेय माझ्या आई-वडिलांना आणि माझ्या गुरूंना जाते."
ग्रामीण भागातील तरुणींसाठी प्रेरणादायी
विद्याचा हा संघर्षमय प्रवास आज ग्रामीण भागातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे विद्याने दाखवून दिले आहे.
कौतुकाचा वर्षाव: विद्याच्या या निवडीबद्दल गुळपोळी ग्रामस्थांकडून तिचे विशेष कौतुक होत असून, शेतीकरी , एका सामान्य कुटुंबातील लेकीने खाकी वर्दी मिळवून गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे. तिच्या या यशाबद्दल महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. "कष्टाचे फळ आणि जिद्दीची साथ, कर्तृत्वाने गाठले यशाचे आकाश!"
कु. विद्या दत्तात्रय काळे, तुला तुझ्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि पोलीस दलातील यशस्वी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा!
0 Comments