कळंब तालुक्यातील दुधाळवाडी शिवारात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मशागत, बियाणे, खते, औषध फवारणी आणि मजुरीवर हजारो रुपयांचा खर्च केला; मात्र पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने उभी पिके सुकून करपण्याच्या अवस्थेत पोहोचली आहेत.
शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. पावसाची प्रतीक्षा करत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
या पार्श्वभूमीवर महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुधाळवाडी शिवारातील सोयाबीन पिकांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई, पीकविमा आणि नैसर्गिक आपत्तीअंतर्गत उपलब्ध मदतीचा लाभ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या 22 ते 23 पासून दुधाळवाडीसह परिसरात पाऊस पडलेला नाही .यामुळे पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहे . मोठ्या प्रमाणात खर्च पेरणीसाठी केला आहे यामुळे शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहे शासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना प्रति 50 हजार ₹ हेक्टरी मदत करावी.-अमोल लाटे शेतकरी दुधाळवाडी
0 Comments