“तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार… पैसे देतो! ”अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या चालकाला हत्येचे आमिष; सोलापुरात दोघांविरुद्ध गुन्हा



सोलापूर | प्रतिनिधी

अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखविल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक आनंद स्वामीराव सुरवसे (वय ३०, रा. मोटयाळ, ता. अक्कलकोट) हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास आमदारांच्या पत्नी व मुलाला घेऊन महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये आले होते. आमदारांचे कुटुंबीय शोरूममध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर सुरवसे हे बाहेर थांबले होते.

याचवेळी पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केलेला एक व्यक्ती सुरवसे यांच्या जवळ आला. “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघून घेतो,” असे त्याने म्हटल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने, “साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे,” असे म्हणत सुरवसे यांना चिथावणी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला आणखी एक व्यक्ती तेथे आला आणि त्याने त्या दोघांना घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितले. या प्रकारामुळे घाबरलेल्या चालक सुरवसे यांनी त्याच दिवशी सायंकाळी आमदारांचे पी.ए. तसेच आमदारांच्या भावाला घटनेची माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर चालकाला आमदारांच्या हत्येसाठी चिथावणी देणारे व्यक्ती श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिसांनी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३(५) आणि ५५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सदाशिव सावंत करीत आहेत.

आमदारांच्या हत्येसाठी थेट त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाची पोलिसांकडून गांभीर्याने चौकशी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments