कोयत्याच्या घावांनी स्नेहलची झुंज अखेर संपली पालघरमधील घटनेने साताऱ्यात संताप; संशयिताला फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबीयांची मागणी



सातारा : पुळकोटी (ता. माण) येथील स्नेहल सावंत (वय २७) हिची स्वप्ने मोठी होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून तिने नुकतीच शासकीय सेवेत पाऊल ठेवले होते. कुटुंबाची परिस्थिती बदलावी, आपल्या कष्टाने आई-वडिलांच्या आयुष्यात सुख यावे, यासाठी ती धडपडत होती. मात्र, अवघ्या सात महिन्यांत तिच्या या स्वप्नांचा निर्दयी हल्ल्याने चक्काचूर झाला. पालघर येथे एकतर्फी प्रेमातून झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहलची सव्वादोन महिन्यांची मृत्यूशी झुंज अखेर बुधवारी संपली.

१२ जून रोजी पालघर येथील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा स्नेहलवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. संशयिताने तिच्या मानेवर आणि कमरेवर सपासप वार केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. गंभीर जखमी झालेल्या स्नेहलला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर संशयित अमोल मुळे याने घटनास्थळावरून पलायन केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पालघर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला ताब्यात घेतले.

हल्ल्याची माहिती मिळताच पुळकोटी येथील स्नेहलचे कुटुंबीय पालघरला धावून गेले. उपचार सुरू असताना तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. गेल्या सव्वादोन महिन्यांपासून कुटुंबीय तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल, या आशेवर होते. प्रत्येक दिवस आशेचा आणि काळजीचा होता. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान स्नेहलने अखेरचा श्वास घेतला आणि कुटुंबीयांच्या आशेचा शेवट झाला.

जमीन विकून मुलीच्या उपचारासाठी पैसा उभा केला

सावंत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मुलीवर झालेल्या हल्ल्यानंतर उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित होता. तरीही कुटुंबीयांनी उपचारात कोणतीही हयगय केली नाही. स्नेहल बरी होईल, या एका आशेवर त्यांनी जमीन विकून उपचारासाठी पैसा उभा केला. प्राथमिक माहितीनुसार तिच्या उपचारासाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च झाले. आर्थिक संकट, मानसिक धक्का आणि मुलीची ढासळत चाललेली प्रकृती अशा तिहेरी संकटाचा सामना करत कुटुंबीयांनी तिच्या जगण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले.

सात महिन्यांतच स्वप्नांचा चुराडा

स्नेहल हुशार आणि अभ्यासू होती. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सात महिन्यांपूर्वी तिची लिपिक पदासाठी निवड झाली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून रुजू झाल्यानंतर सावंत कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मुलीने स्वतःच्या कर्तृत्वावर सरकारी नोकरी मिळवल्याचा अभिमान कुटुंबीयांना होता. नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतानाच तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला. एका क्षणात तिच्या आयुष्याची आणि कुटुंबाच्या स्वप्नांची दिशा बदलली.

कुटुंबीयांचा संताप

स्नेहलच्या मृत्यूने पुळकोटीसह सातारा जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. संशयित अमोल मुळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

“बहिणीवर हल्ला झाल्यानंतर तिचे उपचार सुरू ठेवण्यासाठी अनेक अडचणी आल्या. आम्ही शेवटपर्यंत तिच्या जगण्याची आशा सोडली नाही. आता बहीण या जगात राहिली नाही. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि संशयिताला फाशीची शिक्षा व्हावी,” अशी मागणी स्नेहलचा भाऊ संतोष सावंत यांनी केली.

स्नेहलच्या मृत्यूने एका कुटुंबाचा आधार हिरावला असून, तिच्या अधुऱ्या स्वप्नांचा आणि या हल्ल्याच्या वेदनेचा प्रश्न आता न्यायव्यवस्थेकडे पाहत उभा आहे.

Post a Comment

0 Comments