सुर्डी परिसरात हळहळ
पीक वाचवावे की स्वतःचा जीव? शेतकऱ्यांसमोर भीषण संकट; शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी) - पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर मोठे संकट ओढवले आहे. पावसाची प्रतीक्षा करत असतानाच कडक उन्हामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनचे पीक सुकू लागले असून, हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्या साठी शेतकरी अक्षरशः जीवाचे रान करत आहेत. अशाच परिस्थितीत सुर्डी येथील शेतकरी रमेश सोमनाथ शिरसागर (वय ५३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सोयाबीनचे पीक सुकत असल्याने ते वाचवण्यासाठी शिरसागर हे शेतात स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देण्याची तयारी करत होते. कडक उन्हात आणि प्रतिकूल निसर्गाशी दोन हात करत स्प्रिंकलर जोडण्याचे काम सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सुरडी परिसरासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या मनाला चटका लावणारी ही घटना ठरली आहे.
एकीकडे पिकाला पाण्याची गरज, तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा... अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पीक जगवावे की स्वतःचा जीव वाचवावा? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने शेतकरी कोणत्याही परिस्थितीत पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची आणि जीवाचीही पर्वा केली जात नसल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
रमेश शिरसागर यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी शिक्षण घेत असून, कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन शिरसागर कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
शेतकरी वाचला तरच शेती वाचेल!
धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या पावसाच्या अनिश्चिततेशी झुंज देत आहेत. उघडीप, वाढते तापमान आणि पिकाला पाण्याची वाढती गरज यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याचा पीक वाचवण्याच्या प्रयत्नात जीव जाणे ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण शेतकरी व्यवस्थेच्या वेदनेचे वास्तव चित्र आहे. शासनाने केवळ पंचनामे न करता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करावा आणि संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
0 Comments