कळंब तालुक्यातील मौजे दुधाळवाडी येथे गेल्या सुमारे 45 ते 50 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी व पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
दुधाळवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, ज्वारी व इतर चारा पिकांची लागवड केली होती. मात्र सततच्या कोरड्या हवामानामुळे ही पिके वाळून जात आहेत. सोयाबीन ही पूर्ण पीक जमीन उध्वस्त झाले परिणामी पशुपालकांना जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे
चाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच चारा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.
शासनाने दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेऊन पंचनामे करावेत व शेतकरी तसेच पशुपालकांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी दुधाळवाडी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या 45 ते 50 दिवसांपासून मौजे दुधाळवाडी परिसरात पाऊस नाही यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे साधारणतः मौजे दुधाळवाडी या गावात 4800 ते 5000 लिटर रोज दूध उत्पादन होते याचा फटका चाऱ्यामुळे दूध उत्पादनावर होत आहे शासनांना लवकरात लवकर दखल घेऊन चारा छावण्या चालू करावे .अमोल लाटे शेतकरी दुधाळवाडी
0 Comments