बार्शीत महावितरणचा संतापजनक कारभार! 'धरण असल्याची' शिक्षा गावाला; बावीत केवळ २ तास वीज, संतप्त ग्रामस्थांचा सबस्टेशनवरच ठिय्या


बार्शी (प्रतिनिधी): बार्शी तालुक्यातील बावी येथे महावितरणच्या भोंगळ, नियोजनशून्य आणि दुजाभावपूर्ण कारभाराचा उद्वेगजनक नमुना समोर आला आहे. ऐन उन्हाळ्यात आणि भीषण पाणीटंचाईच्या काळात शेजारील गावांना ८ तास वीजपुरवठा होत असताना, बावी गावाला 'गावात धरण असल्याचे' हास्यास्पद कारण देत केवळ २ तासांची वीज दिली जात आहे. या अमानवीय अन्यायाविरुद्ध अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला असून, संतप्त ग्रामस्थ आणि सरपंचांनी थेट महावितरणच्या सबस्टेशनवरच ठिय्या देत बेमुदत उपोषण पुकारले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बावी गावचे आक्रमक तरुण शेतकरी विशाल मिटे यांनी महावितरणच्या या गलथान कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. प्रशासनावर घणाघाती आरोप करताना ते म्हणाले, "परिसरातील इतर सर्व गावांना महावितरणकडून सुरळीत ८ तास वीज मिळते. परंतु, आमच्या गावात धरण असल्याचा जावईशोध लावत महावितरणने आमच्या हक्काच्या विजेत बेकायदेशीर कपात केली आहे. आम्हाला केवळ २ तास वीज दिली जाते. त्यातही परमिट काढणे आणि इतर तांत्रिक बिघाडांचे कारण पुढे करत प्रत्यक्षात जेमतेम एक ते सव्वा तासच वीज आमच्या पदरात पडते." या तुटपुंज्या विजेवर गावाची तहान कशी भागवायची, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महावितरणच्या या मनमानी आणि हुकूमशाही कारभारामुळे संपूर्ण बावी गावाची पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडून पडली आहे. गावचे सरपंच यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावताना वास्तव मांडले. ते म्हणाले, "गावाची पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान साडेचार तास सलग वीज लागते. त्यानंतर संपूर्ण गावाला पाणी वाटप करण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागतो. जर महावितरण आम्हाला केवळ दोनच तास वीज देणार असेल, तर आम्ही गावकऱ्यांना पिण्याचे पाणी द्यायचे कसे?" प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा जमिनीवरील वास्तव समजून घ्यावे, अशी चपराकही त्यांनी लगावली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जीवनमरणाचा प्रश्न बनला असताना महावितरणचे अधिकारी मात्र वातानुकूलित केबिनमध्ये बसून या समस्येकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक करत आहेत.

"जोपर्यंत आमच्या बावी गावाला पूर्ववत ८ तास वीजपुरवठा सुरू होत नाही आणि आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत आम्ही या सबस्टेशनवरून एक इंचही हलणार नाही," असा आक्रमक आणि थेट इशारा उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी दिला आहे.

आता तरी या सुस्त आणि निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येणार का? बावी गावावरील हा अन्याय दूर करून त्यांना हक्काची वीज आणि पाणी मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास हा जनक्षोभ अधिक उग्र रूप धारण करेल, यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments