परंडा (धाराशिव) : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर तिघा तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने ५ जून २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गावातील एका तरुणाने मोबाईल चार्जिंगला लावण्याचे कारण सांगून पीडितेला मॅंगो ज्यूस दिला. तो ज्यूस पिल्यानंतर तिला गुंगी आल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेचे छायाचित्रण करून, ही बाब कोणाला सांगितल्यास फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर गावातील दुसऱ्या एका तरुणानेही पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच ३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता तिसऱ्या आरोपीने पीडितेला आपल्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेने दिलेल्या प्रथम खबरेवरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1), 64(2), 77, 123, 333, 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(2)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपींची नावे जाहीर करण्यात आलेली नसून, पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
0 Comments