बार्शीत खाणमाफियांची मुजोरी! बेकायदेशीर उत्खननाचे पुरावे प्रशासनाला दिल्याने पत्रकारावर घरात घुसून भ्याड हल्ला



दैनिक पुण्यनगरी'चे पत्रकार प्रशांत खराडे यांना मारहाण; बार्शी शहर पोलिसांत मारहाण व धमकीचा गुन्हा (FIR) दाखल!

बार्शी: शहरात कायद्याचा धाक उरला आहे की खाणमाफियांची दहशत सुरू आहे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. एखाद्या जागरूक पत्रकाराने बेकायदेशीर कामांचे पुरावे महसूल प्रशासनाला देणे हा आता बार्शीत गुन्हा ठरत आहे का? अशाच एका संतापजनक घटनेत, अवैध उत्खननाचे फोटो तहसीलदारांना पाठवल्याच्या रागातून 'दैनिक पुण्यनगरी'चे पत्रकार प्रशांत खराडे यांच्यावर थेट घरात घुसून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांत एका नामनिर्देशित आणि दोन अज्ञात व्यक्तींवर नवीन भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रथम खबर अहवालानुसार (FIR क्र. ०४२९), पत्रकार प्रशांत खराडे हे रविवारी (दि. ३१ मे) दुपारी ४ च्या सुमारास आपल्या घरी विश्रांती घेत होते. यावेळी सचिन ऊर्फ बाळू जाधव (रा. सुभाष नगर, बार्शी) आणि त्याचे इतर दोन साथीदार खराडे यांच्या घरासमोरील शेडमध्ये आले.

"तू सुनील भराडियाच्या खाणीच्या खोदकामाचे फोटो का काढलेस? आणि ते तहसीलदारांना का पाठवलेस?" असा जाब विचारत आरोपी सचिन जाधव याने पत्रकार खराडे यांची थेट कॉलर पकडून त्यांना बेदम मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, हा हल्ला होत असताना खराडे यांच्या पत्नी रूपाली आणि त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिला (मीरा बगाडे व सुनीता पेटणे) यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुंडगिरीची नशा चढलेल्या या आरोपींनी "तुमचा याच्याशी काही संबंध नाही" असे म्हणत उपस्थित महिलांनाही अश्लील शिवीगाळ व दमदाटी केली.

या प्रकरणी प्रशांत खराडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सचिन ऊर्फ बाळू जाधव व इतर दोघांवर BNS च्या कलम ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) (घरात घुसून मारहाण, शिवीगाळ, धमकी देणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा भ्याड प्रयत्न आहे. अवैध उत्खननाचे फोटो प्रशासनाकडे गेल्याने नेमके कोणाचे धाबे दणाणले आहेत? पोलिसांचा तपास आता केवळ मारहाण करणाऱ्यांपुरता मर्यादित राहणार की यामागील 'मास्टरमाईंड' शोधून त्यांच्यावरही कारवाई होणार? बार्शीत पत्रकारांवर असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. प्रशासनाने या प्रवृत्तींना वेळीच ठेचले नाही, तर जनआंदोलन उभे राहील, असा इशारा दिला जात आहे.

Post a Comment

0 Comments