पै.आस्लम काझी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान


कुर्डुवाडी : महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा गौरव वाढविणाऱ्या आणि कुस्ती क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीमुळे “कुस्तीसम्राट” म्हणून ओळख निर्माण केलेल्या पैलवान आस्लम काझी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा हा बहुप्रतिक्षित कुस्ती सोहळा शुक्रवार दिनांक २९ मे २०२६  रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवराय कुस्ती संकुल, कुर्डुवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना चालना देणे, नवोदित मल्लांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्राची समृद्ध कुस्ती परंपरा जतन करण्याच्या उद्देशाने या भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानासाठी राज्यभरातील नामांकित आणि अव्वल दर्जाचे मल्ल सहभागी होणार असल्याने कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या जंगी मैदानाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे तसेच माजी आमदार मा. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजक समितीने व्यक्त केला आहे.

मैदानातील प्रमुख आकर्षण म्हणून प्रथम क्रमांकाची मानाची लढत महाराष्ट्र केसरी पै. सिंकदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगणार आहे. महाराष्ट्रातील दोन दिग्गज मल्लांमध्ये होणारी ही थरारक कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांमध्ये विशेष उत्साह असून, मैदानात रोमांचक वातावरण निर्माण होणार आहे. याशिवाय राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या नामांकित मल्लांच्या अनेक चुरशीच्या आणि अटीतटीच्या कुस्त्या या मैदानात होणार आहेत.

कुस्ती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि ग्रामीण परंपरेचा अविभाज्य भाग असून, अशा स्पर्धांमुळे नव्या पिढीमध्ये पारंपरिक खेळांविषयी आकर्षण निर्माण होत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. पै. आस्लम काझी यांनी अनेक वर्षे कुस्ती क्षेत्रात कार्य करत असंख्य मल्लांना प्रेरणा दिली असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे हे मैदान विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

या भव्य जंगी मैदानाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक समितीने दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या कुस्तीप्रेमींनाही या रोमांचक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

कुस्ती परंपरेचा गौरव वाढविणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास परिसरातील सर्व नागरिक, कुस्तीप्रेमी, युवक व क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कुर्डुवाडी येथील छत्रपती शिवराय कुस्ती संकुल हे गेल्या तेरा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, ग्रामीण भागातील अनेक होतकरू मल्लांसाठी हे संकुल प्रेरणास्थान ठरले आहे. उद्योगपती सुहास शेठ शहा यांनी या संकुलाची स्थापना केली असून, पारंपरिक कुस्ती संस्कृती जपण्याबरोबरच नव्या पिढीतील मल्ल घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून सुरू आहे. या आखाड्याचे वस्ताद म्हणून पै. आस्लम काझी यांनी गेल्या अनेक वर्षांत अनेक कुस्तीपट्टू घडवले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संकुलात विविध निवड चाचण्या, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. ग्रामीण भागातील युवकांना कुस्तीचे सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महाराष्ट्राची समृद्ध कुस्ती परंपरा जपण्यासाठी पै. आस्लम काझी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments