चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


बार्शी/प्रतिनिधी :

चिखर्डे गावातील जि. प. प्राथमिक शाळा चिखर्डे व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिखर्डे येथे शिक्षण घेतलेल्या २००४-०५ या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, दिनांक २ मे रोजी चिखर्डे येथील संभाजीराजे भवन येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. सकाळी ९.३० वाजता जि. प. प्राथमिक शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर संभाजीराजे भवन येथे कार्यक्रमस्थळी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ गुरव सर यांनी भूषविले. कार्यक्रमास पाटील सर, पाचकवडे गुरुजी, पाटील गुरुजी, कासार सर, लाटे सर, भोसले सर व उकिरडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय व मनोगत व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी शालेय जीवनातील अनुभव सांगितले. यानंतर उपस्थित मान्यवर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्नेहमेळावा का घेतला जातो आणि त्यातून कोणते सकारात्मक लाभ मिळतात, यावर गणेश शिंदे, प्रफुल्ल पाटील व सरिता कोंढारे यांनी आपली मते मांडली. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बॅचबद्दल गौरवोद्गार काढत काही विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. भोजनानंतर कार्यक्रमात उखाणे, गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची यासारखे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. या खेळांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

शेवटी सर्व उपस्थितांनी सामूहिक छायाचित्र काढून आनंददायी वातावरणात स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.
हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ भेट नव्हे, तर शालेय जीवनातील मैत्री, आठवणी आणि संस्कार पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याचा आनंददायी क्षण ठरला.

Post a Comment

0 Comments