आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगात योग्य करिअर निवडणे ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरली आहे. 12 वी नंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात, मात्र सुरक्षितता, स्थैर्य आणि भविष्यकालीन संधी यांचा विचार करता फार्मसी क्षेत्र हे एक अत्यंत आशादायी करिअर म्हणून पुढे येत आहे.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा औषध उत्पादक देश असून, जागतिक स्तरावर जनरिक औषध पुरवठ्यात भारताचा सुमारे 20% पेक्षा अधिक वाटा आहे. भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाची किंमत सध्या अंदाजे 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असून, पुढील काही वर्षांत हा उद्योग 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामुळे या क्षेत्रात प्रशिक्षित फार्मासिस्टसाठी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
फार्मसी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती, गुणवत्ता नियंत्रण (Quality Control), गुणवत्ता हमी (Quality Assurance), संशोधन व विकास (R&D), क्लिनिकल ट्रायल्स, हॉस्पिटल फार्मसी, तसेच मेडिकल स्टोअर व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळते. याशिवाय, Drug Inspector, Pharmacist, Clinical Research Associate, Production Officer अशा अनेक प्रतिष्ठित पदांवरही करिअर करता येते.
विशेष म्हणजे, भारतात दरवर्षी हजारो नवीन फार्मसी पदवीधर तयार होत असले तरी, कौशल्यपूर्ण व प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी अजूनही जास्त आहे. तसेच, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, गल्फ देश यांसारख्या परदेशी बाजारपेठांमध्येही भारतीय फार्मासिस्टसाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत.
फार्मसी हे केवळ करिअर नाही, तर समाजसेवेचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. योग्य औषधांची माहिती देणे, रुग्णांना मार्गदर्शन करणे आणि आरोग्य व्यवस्थेत योगदान देणे ही फार्मासिस्टची जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या करिअर निवडीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या आवडी व क्षमतेनुसार योग्य दिशा देणे गरजेचे आहे. फार्मसी क्षेत्र हे सुरक्षित, सन्मानजनक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम भविष्य देणारे आहे, याची जाणीव ठेवावी.
आजच्या स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी योग्य निर्णय आणि दर्जेदार शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे फार्मसी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी ओळखून पुढे यावे.
प्रा. मनोहर केंगार
(प्राध्यापक, श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव)
0 Comments