‘प्रशांत परिचारक वाटत नाहीत का तुम्हाला?’ या प्रश्नाने अध्यक्षपदाच्या चर्चेला मिळाली नवी दिशा
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता बँकेच्या चेअरमनपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशांत परिचारक यांचे नाव घेत केलेल्या सूचक विधानामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत परिचारक यांचे नाव चर्चेत आले आहे.
बँकेचा चेअरमन यंग होणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विचारला. त्यावर गोरे यांनी थेट प्रशांत परिचारक यांच्याकडे हात करत, ‘प्रशांत परिचारक वाटत नाहीत का तुम्हाला?’ असे मिश्किल; मात्र सूचक उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये चर्चेला सुरुवात झाली.
पालकमंत्र्यांच्या या विधानाचा राजकीय अर्थ लावला जात असून, डीसीसी बँकेच्या चेअरमनपदासाठी प्रशांत परिचारक यांच्या नावाला पसंती मिळू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अर्थात, गोरे यांच्या विधानातून नेमका राजकीय संकेत मिळाला की ते केवळ उत्स्फूर्त उत्तर होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलने १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालानंतर आता चेअरमनपदाच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अध्यक्षपदासाठी संचालकांचे पाठबळ, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि भाजप नेतृत्वाची पसंती निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री गोरे यांनी जाहीरपणे प्रशांत परिचारक यांचे नाव घेतल्याने बँकेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे डीसीसी बँकेच्या चेअरमनपदाची माळ खरोखरच प्रशांत परिचारक यांच्या गळ्यात पडणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अधिकृत निर्णय मात्र अद्याप जाहीर झालेला नाही.
0 Comments