कोल्हापूर : धरणग्रस्त बांधव आणि वाकिघोल परिसरातील नागरिकांच्या स्नेहमेळाव्याचे निमित्त ठरलेली भव्य लेझीम स्पर्धा दुबळेवाडी येथे उत्साहात पार पडली. सद्गुरू बाळूमामा दूध संस्था, दुबळेवाडी ता.राधानगरी यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला परिसरातील लेझीम मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला.
ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता धरणग्रस्त बांधवांच्या पुनर्भेटीचा आनंदसोहळा ठरली. धरणाच्या पाण्याखाली घरे आणि शेती गेलेल्या कुटुंबांना लेझीम स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या मातीशी आणि जुन्या आठवणींशी जोडले जाण्याची संधी मिळाली. सुख-दुःखाची देवाणघेवाण, आपुलकीच्या भेटी आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन या माध्यमातून घडले.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांकाचे १५ हजार २६ रुपयांचे पारितोषिक रामलिंग लेझीम मंडळ, वाडदे वसाहत, कसबा सांगाव यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे १० हजार २६ रुपयांचे पारितोषिक वाकनाथ लेझीम मंडळ, वाकी वसाहत, कसबा सांगाव यांनी मिळवले. तृतीय क्रमांकाचे ७ हजार २६ रुपयांचे पारितोषिक छत्रपती शिवाजी महाराज लेझीम मंडळ, श्रीनगर, हुन्नगुती वसाहत यांनी, तर चतुर्थ क्रमांकाचे ५ हजार २६ रुपयांचे पारितोषिक रामलिंग लेझीम मंडळ, चाफोडी यांनी मिळवले. उत्तेजनार्थ पारितोषिक दीरबादेवी लेझीम मंडळ, उदगाव वसाहत यांना देण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट हलगीवादक म्हणून दीरबादेवी लेझीम मंडळाचे बयाजी पाटील, उत्कृष्ट झांजवादक म्हणून वाकीचे पांडुरंग पाटील, उत्कृष्ट ढोलवादक म्हणून हुन्नगुतीचे शिवाजी केणे आणि उत्कृष्ट शिट्टीवादक म्हणून वाडदेचे संतोष पाटील यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण बळवंत रेपे (सर), नामदेव पाटील, दत्तात्रय देसाई आणि अशोक रेपे यांच्या पंच कमिटीने पारदर्शक व निष्पक्षपणे केले. स्पर्धेचे समालोचन बंडा दादा पाटील (वाकी) आणि भिकाजी केणे (दानोळी) यांनी केले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत डॉ. अजित कोल्हापुरे, डॉ. विलास मांगले, डॉ. धनाजी ढोकरे आणि डॉ. राहुल कोल्हापूरे यांनी मोलाचे योगदान दिले.
यावेळी धरणग्रस्त बांधवांसह वाकिघोल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या लेझीम मंडळांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहभागी मंडळांचे, पंच कमिटीचे, समालोचकांचे, वैद्यकीय पथकाचे, देणगीदारांचे, कार्यकर्त्यांचे, ग्रामस्थांचे आणि प्रेक्षकांचे सद्गुरू बाळूमामा दूध संस्था, दुबळेवाडी यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
0 Comments