पानगावजवळ थार कारचा भीषण अपघात; ओंकार पैलवानचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी



बार्शी : तालुक्यातील बार्शी–सोलापूर रोडवर पानगावजवळ गुरुवारी मध्यरात्री महिंद्रा थार गाडीचा भीषण अपघात झाला. उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिल्यानंतर थार गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात ओंकार गजानन पैलवान (वय २३, रा. जुळे सोलापूर) याचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाळे टोलनाक्याजवळ ओंकार पैलवान व समर्थ जाधव हे महिंद्रा थार (MH-13-ES-9897) घेऊन आले. यावेळी त्यांनी ऋषीकेश भोसले व वैभव जाधव यांना बार्शीला जाऊन येण्याचे सांगितले. त्यानंतर चौघेही थार गाडीतून बार्शीकडे निघाले.

थार गाडी ओंकार पैलवान चालवत होता, तर समर्थ जाधव पुढील सीटवर आणि ऋषीकेश भोसले व वैभव जाधव मागील सीटवर बसले होते. वैराग पार करून बार्शीकडे येत असताना पानगावजवळ पुढे जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याचवेळी समोरून इर्टिगा कार आल्याने थार चालकाने गाडी पुन्हा ट्रॅक्टरच्या मागे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी थारची ट्रॉलीच्या चाकाला धडक बसली. धडक बसल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. हा अपघात रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात चालक ओंकार पैलवान याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. समर्थ बाबुराव जाधव (वय २४) याच्या डोक्याला दुखापत झाली, तर वैभव बाबुराव जाधव (वय २१) याच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर मार लागला. ऋषीकेश बहादुर भोसले (वय १८) याला किरकोळ मुकामार लागला. सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद असून पुढील तपास पोलीस नाईक काळेले करीत आहेत.


Post a Comment

0 Comments