पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत बंडखोरीची चाहूल; मंगेश चिवटे मंगळवारी अर्ज दाखल करणार



पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर चिवटे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे आजच्या वृत्तांतून समोर आले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रा. डॉ. सचिन सानपही इच्छुक होते. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन सानप यांच्यासाठी सामंत यांची फिल्डिंग सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतच उमेदवारीवरून रस्सीखेच असल्याचे चित्र आहे. चिवटे यांनी गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक संघटनांच्या भेटीगाठी आणि मेळाव्यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोर्चेबांधणी केली आहे. 

त्यांनी महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. मात्र, आज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याची आणि कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मंगेश चिवटे अर्ज दाखल करणार असल्याने महायुतीसमोर बंडखोरीचे नवे आव्हान उभे राहिले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात आता चिवटे अर्ज दाखल करतात का, शिवसेनेची पुढची भूमिका काय असते आणि सचिन सानप यांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments