अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई; ऊसाच्या शेतातून तब्बल १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त


अक्कलकोट : अंमली पदार्थांच्या विरोधात सोलापूर जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत अक्कलकोट दक्षिण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी तब्बल २११ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती.

गोपनीय माहितीने पोलिसांची कारवाई
दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशांत बधे व त्यांचे पथक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी दूरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत आळगी येथील एका शेतात ऊसाच्या पिकामध्ये गांजासदृश्य वनस्पतींची लागवड करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक संबंधित शेतात दाखल झाले.

ऊसाच्या शेतात १२ फूट उंचीची गांजाची झाडे
पोलिसांनी शेताची पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी अंदाजे १२ फूट उंचीची गांजासदृश्य झाडे आढळून आली. पंचनामा करून पोलिसांनी ही झाडे जप्त केली.

या कारवाईत एकूण २४० गांजाची झाडे आढळली. त्यापैकी २१० झाडे जिवंत, तर ३० झाडे वाळलेली होती. जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये आहे.

या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पुढील तपास सुरू
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत. ऊसाच्या शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड कशाप्रकारे करण्यात आली, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या गांजाची विक्री कुठे केली जाणार होती, याबाबत तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 

Post a Comment

0 Comments