हॉटेल निसर्गजवळ अपघाताची थरारक घटना; कार दोन वेळा पलटी, गाडीचे मोठे नुकसान
अरण, ता. माढा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत हॉटेल निसर्गजवळ भरधाव स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत जाऊन दोन वेळा पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोडनिंब येथून टेंभूर्णीकडे MH 12 RF 3516 क्रमांकाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जात होती. अरण गावाच्या हद्दीतील भारत पेट्रोल पंपाजवळील हॉटेल निसर्ग परिसरात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या चारीत जाऊन पलटी झाली. यामध्ये कारमधील सुमित सुनील बिनगे (वय १९) आणि प्रथमेश दत्तात्रेय बिनगे (वय २०) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व पाठीला जबर मार लागला आहे. तर कारचालक समर्थ सतीश साळुंके (वय २२, रा. मोडनिंब, ता. माढा) हा किरकोळ जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील गस्ती पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. प्रशांत कारंजकर व रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड यांनी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात कार दोन वेळा पलटी झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती वरवडे टोलनाका गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे अधिकारी श्री. जगताप तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे PSI किरण आवताडे यांना दिली. पुढील तपास सुरू आहे.
0 Comments