खांबाला चिकटलेल्या मुलाला वाचवायला गेलेल्या वडिलांचा थरार! अर्थिंग वायरच्या धक्क्याने ६ वर्षीय स्वराजचा मृत्यू"


दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सोमवारी सायंकाळी 6 /30 वाजण्याच्या सुमारास अर्थिंग वायरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे ६ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वराज गोरख साठे असे मृत बालकाचे नाव आहे.

घराशेजारी खेळत असताना स्वराजचा विजेच्या खांबाला असलेल्या अर्थिंग वायरला स्पर्श झाला. जोरदार झटका बसल्याने तो खांबालाच चिकटला.  आपला मुलगा धोक्यात असल्याचे पाहून वडील गोरख साठे त्याला सोडवण्यासाठी धावले. मुलाला बाजूला ओढताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने विजेचा प्रवाह तीव्र असल्याने ते दूर फेकले गेले आणि त्यांचे प्राण वाचले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

गंभीर अवस्थेतील स्वराजला मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून रात्री 10 वाजता कंदलगाव येथील साठे वस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही माहिती कृष्णांत रामचंद्र साठे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली आहे. मंद्रूप पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटने संपूर्ण कंदलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments