पंढरीत फडकली बार्शीची पताका, पत्रकार शहाजी फुरडेंचा 'भागवत धर्म प्रसारक' पुरस्काराने सन्मान



श्री संत मुक्ताबाई संस्थानचा पंढरपुरात प्रतिष्ठेचा सन्मान; वारी आणि भागवत धर्म प्रसारातील योगदानाचा गौरव

सोलापूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र पंढरपूर येथे लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी तथा पालखी सोहळा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा प्रतिष्ठेचा "भागवत धर्म प्रसारक" पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री संत मुक्ताबाई मठात आयोजित झालेल्या विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे, बार्शीच्या भगवंत नगरीचा विठ्ठलच्या पंढरीत सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

हा पुरस्कार संस्थानचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षी राज्यातील अशा एका पत्रकाराला दिला जातो, ज्याने आषाढी वारीचे सातत्यपूर्ण आणि निष्ठेने वार्तांकन करत भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. पुरस्कारामध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ आणि संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे शंकर टेमघरे, विलास काटे, राजेंद्रकृष्ण कापसे, औदुंबर भिसे, प्रा. किरण गाढवे, विकास भालके, सुधीर गुळमे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले की, "ज्या संत मुक्ताईने माऊलींना उपदेश केला, त्या संत मुक्ताईच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या महापर्वात आणि श्री क्षेत्र पंढरपूरच्या पवित्र भूमीत प्रदान होणे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. वारीचे निष्ठेने वार्तांकन करणाऱ्या राज्यातील एकाच पत्रकाराला हा पुरस्कार दिला जात असल्याने त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते."

शहाजी फुरडे-पाटील गेली २० वर्षे लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून, गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी पालखी मार्गावर प्रत्यक्ष फिरून आषाढी वारीचे सातत्यपूर्ण वार्तांकन केले आहे. वारकरी संप्रदाय, भागवत धर्म, वारीतील सामाजिक-सांस्कृतिक परंपरा आणि वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने वाचा फोडली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज तसेच आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यांवरील त्यांचे लेखन विशेष गाजले आहे. इंदापूर, फलटण ते पंढरपूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील घडामोडींसह वारकऱ्यांच्या मूलभूत समस्याही त्यांनी प्रभावीपणे मांडल्या. आषाढी एकादशी, श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजा आणि पंढरपूर वारीचे वार्तांकनही त्यांनी सातत्याने केले आहे.

सन २००८ मध्ये लोकमतचे तत्कालीन संपादक सुधीर महाजन आणि पंढरपूर कार्यालय प्रमुख प्रताप नलावडे यांनी त्यांना प्रथम वारी वार्तांकनाची संधी दिली. पहिल्याच वर्षी त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, विलास काटे, राजेंद्रकृष्ण कापसे तसेच राजाभाऊ चोपदार आणि पुंडलिक मोरे महाराज यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

याशिवाय बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात आयोजित जयवंत बोधले महाराजांच्या प्रवचनमालेवर "बोधवाणी" या सदरातून सलग पाच वर्षे त्यांनी लेखन केले आहे. पंढरपूरहून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या पांडुरंगराय पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील बार्शी येथील दुपारच्या विसाव्याच्या नियोजनात आणि वारकरी सेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

यापूर्वी 5 जणांचा सन्मान 

यापूर्वी सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, मनोज मांढरे, राजेंद्रकृष्ण कापसे आणि सुनील लांडगे यांसारख्या मान्यवर पत्रकारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वारीचे सातत्यपूर्ण वार्तांकन, भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी केलेले योगदान आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत शहाजी फुरडे-पाटील यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल पत्रकार, वारकरी, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments