खाण माफियांचा उच्छाद : आठ दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा; प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
बार्शी (प्रतिनिधी) : कर्तव्य बजावत असलेल्या एका पत्रकारावर घरात घुसून भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बार्शीत घडली आहे. 'दैनिक पुण्यनगरी'चे बार्शी तालुका प्रतिनिधी प्रशांत खराडे यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याचा 'डिजिटल मीडिया पत्रकार (संघ) असोसिएशन (DMPS), सोलापूर' तसेच बार्शीतील सर्व पत्रकारांनी अत्यंत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आठ दिवसांत राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा खणखणीत इशारा बार्शीचे प्रांत अधिकारी (उपविभागीय अधिकारी) यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
रविवारी, दिनांक ३१ मे २०२६ रोजी पत्रकार श्री. प्रशांत खराडे यांनी आपल्या पत्रकारितेच्या कर्तव्याचा भाग म्हणून एका दगड खाणीतील बेकायदेशीर उत्खननाचे वार्तांकन करण्यासाठी काही छायाचित्रे (फोटो) काढली होती. प्रशासनाला माहिती देण्यासाठी त्यांनी ती छायाचित्रे आपल्या कार्यालयालाही पाठवली. मात्र, खाणीचे सत्य उघडकीस आणल्याच्या रागातून बार्शीतील सचिन ऊर्फ बाळू जाधव याने श्री. खराडे यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या संतापजनक घटनेबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकारावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, तो लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला भ्याड हल्ला आहे, अशी भूमिका पत्रकार संघाने मांडली आहे. बार्शीमध्ये यापूर्वीही पत्रकारांना धमकावण्याचे निंदनीय प्रकार घडले आहेत; परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, अशी खंत या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. समाजमाध्यमांचा आणि पर्यायाने सत्याचा गळा दाबण्याचा हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही पत्रकारांनी दिला आहे.
प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित गुन्हेगारावर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी. येत्या आठ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई न झाल्यास, बार्शीतील सर्व पत्रकार एकत्र येऊन राज्यव्यापी आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील. यातून निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार (संघ) असोसिएशनचे जिल्हा पश्चिम अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, सचिव संजय बोकेफोडे, बार्शी शहर अध्यक्ष गणेश शिंदे, बार्शी ग्रामीण अध्यक्ष संतोष कानगुडे, महिला आघाडी प्रमुख राजश्री गवळी, मार्गदर्शक रमेश गायकवाड, रमण कारंजकर, कायदेशीर सल्लागार अॅड. शंकर ननवरे यांच्यासह जिल्हा, शहर व ग्रामीण कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि बार्शीतील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव व योग्य त्या कारवाईसाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, यांना पाठविण्यात आली आहे.
0 Comments