परंडा तालुक्यातील कुंभेजा येथे एका माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कुंभेजा येथे ही घटना घडली. कॅनॉलच्या बाजूला असलेल्या शेतवस्तीवर माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप आणि त्यांची पत्नी घराबाहेर झोपले होते. यावेळी अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आणि अंधारामुळे आरोपींचे वर्णन उपलब्ध नसल्याने हे तपासाचे मोठे आव्हान होते.
तथापि, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी डोकेवाडी शिवारात सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून सात जणांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
१) किरण पंडित शिंदे (२६ वर्षे, रा. अनाळा)
२) राघवा निवांत्या शिंदे (२५ वर्षे, रा. अनाळा)
३) ज्ञानेश्वर लिंग्या काळे (२३ वर्षे, रा. हिवर्डा)
४) विकास नागेश भोसले (२९ वर्षे, रा. डोकेवाडी)
५) सुनील प्रकाश भोसले (२२ वर्षे, रा. अंजनसोंडा)
६) चेतन किरण शिंदे (१९ वर्षे, रा. अनाळा)
७) सुनील चरण शिंदे (२२ वर्षे, रा. अनाळा)
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली (किंमत १.२५ लाख) असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फत्ते केली.
0 Comments