बार्शी प्रतिनिधी दि.१४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शी शहरात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. रखरखत्या उन्हात भीम अनुयायांना दिलासा मिळावा यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाटलीबंद थंड पाण्याचे वाटप करून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. हा उपक्रम शहरात विशेष लक्षवेधी ठरला.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. त्याच भावनेतून डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनच्या वतीने कडक उन्हाळ्यात समाजहिताचा उपक्रम राबविण्यात आला. या पाणी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी महाआघाडीतील नगरसेवक व नगरसेविकांसह कार्यक्रमस्थळी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना आमदार सोपल म्हणाले, “चौथ्या स्तंभाने असे समाजोपयोगी उपक्रम अखंडितपणे राबवावेत. पाणी वाटपाचा घेतलेला वसा अविरत सुरू ठेवावा. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहीन,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या उपक्रमाची संकल्पना महिला आघाडी प्रमुख राजश्री गवळी व उपाध्यक्ष शिंदे यांच्या पुढाकारातून सुचल्याचे संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितले. संकल्पना मांडल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता कार्यक्रमाला मंजुरी देत तो यशस्वी करण्याचा निर्धार संघटनेने केल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण अध्यक्ष संतोष कानगुडे यांनी अशा प्रकारचे उपक्रम संघटनेमार्फत वारंवार राबविण्यात येतील, अशी भूमिका व्यक्त केली.
यावेळी जिल्हा पश्चिम अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, खजिनदार अजय पाटील उपस्थित होते. तसेच बार्शी येथून गणेश शिंदे, संतोष कानगुडे, अभिजीत शिंदे, निलेश उबाळे, समाधान विधाते, विश्वनाथ सोनवणे आणि महिला आघाडी प्रमुख राजश्री गवळी यांनी हजेरी लावली.
हा समाजोपयोगी उपक्रम प्रेरणादायी असून भविष्यात अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी मागणी भीम अनुयायांनी यावेळी व्यक्त केली.
0 Comments