भाऊ, बरेच काही सांगून जातात हे फोटो ; ते सगळे आमदार झाले आता शहाजी भाऊंची बारी



सोलापूर |

 राज्यातील नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पार्टीने सर्वच निवडणुकीमध्ये मोठे यश मिळवले. विशेष करून सोलापुरात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली आहे. या दोन्ही सत्तेचे किंगमेकर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते. 

पण काही असे चेहरे आहेत की, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. ते सहसा पिक्चर मध्ये नसतात. पक्षाशी एकनिष्ठ, संयमी, शांत राहून काम करत आहेत अशांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून खऱ्या अर्थाने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार यांचे. 

महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूकित त्यांना दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडल्याचे दिसून आले. शहरांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडवण्यात आणि त्या यशस्वी करण्यात शहाजी भाऊंचा मोठा वाटा होता. विशेष करून शहर मध्य मतदारसंघात विधानसभा निवडणुकी वेळी सुद्धा त्यांची भूमिका निर्णय ठरली आहे. 

महापालिका निवडणुकीत सुद्धा त्यांनी भाजपला सत्ता मिळवण्यात आपले योगदान दिले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वच तीनही जागा भारतीय जनता पार्टीकडे खेचून आणण्यात शहाजी पवार यांचाही वाटा महत्त्वाचा आहे. 

आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांमधून निवडून येणारा आमदार म्हणजेच विधान परिषदेच्या निवडणुकीचे चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप माने यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यातच शहाजी पवार यांचे सुद्धा नाव येत आहे. 

तसे पाहायला गेले तर परिचारक, माने, पाटील, राऊत या सर्वांच्या नावापुढे आमदारकी लागली आहे. पक्षाने शहाजी भाऊंचा विचार करावा असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. त्यांनी दिलेले योगदान याचा विचार करून यांना भाऊंना विधान परिषदेत पाहायला आवडेल असेही कार्यकर्ते बोलत आहेत. 

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आता सोलापूर शहरासह जिल्ह्यात दबदबा आहे. सोबतीला आमदार सचिन कल्याणशेट्टी असल्याने तर तोडच नाही. ते देतील तो उमेदवार विधान परिषदेत सुद्धा निवडून येईल ही काळया दगडावरची रेष म्हणावी लागेल. शुक्रवारी मार्डी येथील पवार यांच्या शेतात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे या सर्वांनीच हुरड्याचा आस्वाद घेतला. त्या ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि हे फोटो येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी बरेच काही सांगून जात आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Post a Comment

0 Comments