तेरणा कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात


पाण्याचा बंदोबस्त करण्याची ढोकी ग्रामस्थांची मागणी

धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी जमिनीत मुरुन, पाझरुन ढोकी गावातील बोअरवेल्समध्ये येत आहे. विशेष म्हणजे तेच पाणी नागरिकांना पाण्यासाठी व सांडण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे लहान मुलांसह वृद्ध नागरिक यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. त्या पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त करून आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी ढोकी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे दि.१७ फेब्रुवारी रोजी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांमध्ये याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहे.

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे केमिकल युक्त अतिरिक्त पाण्याची नियमानुसार विल्हेवाट न लावता तेरणा कारखान्याचे जमिनीत लाखो लिटर पाणी सोडून दिलेले आहे. ते सोडून दिलेले पाणी जमिनीत मुरुम, पाझरुन ढोकी गावात असलेल्या बोअरवेल्समध्ये मिसळत आहे. ढोकी गावातील नागरिकांना पिण्याचे आणि सांडपाणी एकमेव स्त्रोत आहे, त्याला दुसरा पर्याय नाही.  त्यामुळे बोअरमधील पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या अंगावर चट्टे येणे, डोळे लाल होणे तसेच काजळीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. यावर निहाल काझी, संग्राम देशमुख, दगडू धावारे, दौलत गाढवे, विलास रसाळ, शहाजी कांबळे, जीवन देशमुख, एजाज काझी, दत्ता धावारे, राजपाल दाणे, सिराज मुल्ला, अमर देटे, अनिल भुतेकर, राजू रसाळ, नारायण कसबे, सागर दाणे, दत्ता कसबे, दादासाहेब काळे, नाना पवार, छगन पवार, संजय पवार, जनाबाई चव्हाण, मिनाबाई शिंदे, रजिया पठाण, राणी लोहार, सुनिता ढवारे, रंजना जोशी, नौशाद शेख, मलेका मजाक, मुक्ता लोहार, लाडूबी मोमीन, सोहेल सय्यद, झुंबर बोडके, सुशेन मोहिते यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments