सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी येत आहे. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना १६ फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
रूपा भवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक कॉलेजसमोरून बर्गमन स्कूटर क्रमांक MH-13-ER-0627 वरून तीन मित्र जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की तिन्ही युवक जागेवरच पडले आणि त्यांची दुचाकी काही अंतरावर फेकली गेली.
१. नागेश प्रकाश गवंडी (२७) – रविवार पेठ
२. रोहन अशोक कोरे (२३) – श्रीशैल नगर, भवानी पेठ
३. बसवराज सुनील चनशेट्टी (२५) – शेळगी, सोलापूर असे मयत झालेल्या तिन्ही मित्रांचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नागेश गवंडी टोल नाक्यावर नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहेत. रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे. बसवराज चनशेट्टी पुण्यातील बजाज फायनान्समध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे तीनही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.
0 Comments