धाराशिव महावितरणमध्ये ३० हजारांची लाच; तिघा कर्मचाऱ्यांना ACB ने रंगेहाथ पकडले



महावितरण कंपनीत इच्छित ठिकाणी बदली आणि पदस्थापना देण्याच्या निमित्ताने लाच घेणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पकडले गेलेले आरोपी उदय दत्तात्रय बारकुल (वय ४१, निम्नस्तर लिपिक, उपकार्यकारी अभियंता कार्यालय, महावितरण धाराशिव), भारत व्यंकटराव मेथेवाड (वय ५०, उपव्यवस्थापक-मानव संसाधन, विभागीय कार्यालय महावितरण धाराशिव) आणि शिवाजी सिद्राम दूधभाते (वय ४०, उच्चस्तर लिपिक, अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय, महावितरण धाराशिव).

तक्रारदाराने २६ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दिली होती की, त्याची आणि त्याच्या मित्राची इच्छित ठिकाणी बदली करून देण्यासाठी बारकुल यांनी यापूर्वी २०,००० रुपये आणि मित्राकडून १०,००० रुपये असे एकूण ३०,००० रुपये घेतले. मात्र बदली केली नाही. त्यानंतर पुन्हा मेथेवाड यांनी तक्रारदाराकडून २०,००० रुपयांची लाच मागितली.

तक्रारीच्या पडताळणी दरम्यान बारकुल यांनी ३०,००० रुपये घेतल्याचे आणि त्यातील १०,००० रुपये मेथेवाड यांना तर १०,००० रुपये दूधभाते यांना दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच मेथेवाड यांनी बारकुलकडून आलेल्या २०,००० पैकी ५,००० रुपये यापूर्वी घेतल्याचेही उघड झाले. तिघेही आरोपी एकत्रितपणे लाच स्वीकारत असल्याचे स्पष्ट झाले. आज महावितरण कार्यालयात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. 

त्यांच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, शासकीय ओळखपत्रे जप्त करण्यात आली असून त्यांच्या घरी झडती सुरू आहे. तिघांचे मोबाईल फोन तपासणी आणि फॉरेन्सिक विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. या कारवाईचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विजय वगरे तर तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापूरे हे आहेत. कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
महावितरणमधील लाचखोरीचे हे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव करीत आहे.

Post a Comment

0 Comments