ऐन आषाढीमध्ये पंढरपूर तहसील पुरवठा कार्यालयाचे भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावरपंढरपूर |

आषाढी एकादशीच्या काळात, पंढरपूर तहसील पुरवठा कार्यालयातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर गावभेटीदरम्यान कासेगाव ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींवरून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पंढरपूर प्रांत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, मोहोळ पुरवठा निरीक्षक व सोलापूर पुरवठा यांच्या चौकशी समितीवर नियुक्ती केली आहे.

ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. धान्य चालू करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी आणि N नंबर काढण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. चौकशी दरम्यान ग्रामस्थांनी स्पष्टपणे जबाब दिला की, सदानंद नाईक हे तहसील कार्यालयात बसून पैसे मागत आहेत. यावरून पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे आता चांगलेच कोंडीत अडकले आहेत.

ग्रामस्थांच्या जबाबातील ठळक मुद्दे :
1. नाव समाविष्ट करण्यासाठी : अन्नसुरक्षा यादीत नाव समाविष्ट करून धान्य चालू करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये मागणी.
2. N नंबर काढण्यासाठी : पाचशे रुपये मागणी.

ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षकांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणून जबाबाचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले आहेत. यामुळे या चौकशीमध्ये कोणताही फेरबदल होऊ नये तसेच राजकीय दबाव येऊ नये. 

चौकशी समितीची भूमिका :
चौकशी समितीने कासेगाव येथील सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा जाबजबाब घेतले आहेत. पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी आपला बचाव पक्ष सादर करण्यासाठी इतर दुकानदारांकडून ढोबळ जाब जबाब घेत असल्याचे समजते. मात्र, कासेगाव ग्रामस्थांनी स्पष्ट केले की तक्रार ही त्यांची आहे आणि इतर दुकानदारांचा जबाब गृहीत धरू नये. 

ग्रामस्थांची आक्रमक भूमिका :
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुरवठा निरीक्षकांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे पंढरपूर तहसील कार्यालयातील या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे काय निष्कर्ष निघतात, याकडे सर्व पंढरपूरचे लक्ष वेधून आहे.

पंढरपूर तहसील पुरवठा कार्यालयातील या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने या तक्रारींची त्वरित आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा.

Post a Comment

0 Comments