धक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूचे कोरोनामुळे निधन


देशात कोरना व्हायरसच्या  रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या  चार क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित  करावी लागली. त्यातच भारतीय क्रिकेटला कोरोनामुळे आणखी एक धक्का बसला आहे. राजस्थानचा क्रिकेटपटू विवेक यादव  याचं वयाच्या ३६ व्या वर्षी कोरोनामुळे निधन  झालं आहे. विवेक गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होता. त्यातच त्याला गेल्या आठवड्यात कोरोना झाला होता.

विवेकनं २००८ साली राजस्थानकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राजस्थाननं २०१०-११ साली रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्या टीमचाही तो सदस्य होता. विवेकनं फायनल मॅचमध्ये बडोद्याविरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या. रेल्वे विरुद्ध दिल्लीत झालेल्या रणजी मॅचमध्ये त्यानं १३४ रन देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती.

विवेक २०१२ साली दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) या आयपीएल (IPL) टीमचा सदस्य होता. त्याचबरोबर भारत अंडर-१९ आणि राजस्थान रॉयल्सकडूनही तो क्रिकेट खेळला आहे. ऋषिकेश कानिटकरच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान टीमचा तो नियमित सदस्य होता.

विवेकच्या मित्रांनी आणि सहकारी क्रिकेटपटूंनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "आव्हानांचा सामना करण्यास सदैव सज्ज असलेला क्रिकेटपटू असं त्यांनी विवेकचं वर्णन केलं आहे." राजस्थान क्रिकेट असोसिएशननं देखील याबाबत शोक व्यक्त केलाय. कोरोनामुळे राजस्थान क्रिकेटचं या आठवड्यात झालेलं हे दुसरं नुकसान आहे.

यापूर्वी राजस्थान क्रिकेटमध्ये टायगर या नावावे प्रसिद्ध असलेले किशन रुंगठा यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं. ते राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य होते. त्याचबरोबर राजस्थान रणजी टीमचे माजी कॅप्टन देखील होते.

Post a Comment

0 Comments