शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र परिषदेचे आयोजन; राज्यशास्त्रातील नव प्रवाहांचे चर्चाविश्व रंगणार

कोल्हापूर |

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ व्या वार्षिक अधिवेशनाचे आणि दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. 'राज्यशास्त्रातील नव प्रवाहांचे चर्चाविश्व' (Discourse of New Trends in Political Science) या मध्यवर्ती विषयावर आधारित हे अधिवेशन शुक्रवार, १३ मार्च आणि शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पार पडणार आहे.

राज्यशास्त्रातील नव प्रवाहांवर होणार मंथन :

या दोन दिवसीय चर्चासत्रात राज्यशास्त्रातील विविध बदलत्या पैलूंवर सविस्तर चर्चा केली जाईल. यामध्ये मुख्यत्वे 

*   राजकीय सिद्धांतांमधील नवीन प्रवाह.
*   राजकीय विचारांमधील बदलती दिशा.
*   लोकप्रशासन, शासन आणि त्यातील नव प्रवाह.
*   आंतरराष्ट्रीय संबंधांमधील नवीन आव्हाने आणि प्रवाह 

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन :

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून, सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील भूषवणार आहेत. प्रा. डॉ. पी. डी. देवरे हे या प्रसंगी बीजभाषण (Keynote Address) करतील.


चर्चासत्रात विविध सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. अशोक चौसाळकर 'भारतीय राजकीय विचारांची सद्यकालीन प्रस्तुतता' यावर, तर दुसऱ्या सत्रात श्री. जयदेव डोळे 'सामाजिक चळवळ आणि राजकारण' या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. श्रीराम पवार 'जागतिक राजकारणातील नव प्रवाह व भारत' या विषयावर आपले विचार मांडतील.

संशोधकांसाठी शोधनिबंध सादरीकरणाची संधी : 

या अधिवेशनामध्ये प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे शोधनिबंध सादर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

आयोजन समिती : 

या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील, अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र भणगे, नेहरु अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. प्रल्हाद माने आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती कार्यरत आहे. या अधिवेशनास जास्तीत जास्त प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments