अखेर या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे...



 मुंबई |

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. राज्यात या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेला विरोध नाही पण लाडक्या भावासाठी सरकारने अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नसल्याची टीका विरोधकांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांना सडेतोड उत्तर दिले. योजनेची घोषणा होताच राज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. आता अखेर या योजनेचे पैसे कधी जमा होणार? याची तारीख समोर आली आहे. दरम्यन, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. 

1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. पण, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, अर्ज भरताना आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र हे कागदपत्र लागणार आहेत. योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाइल ॲप वर किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती ॲपवरही अर्ज भरता येणार आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments