Supriya Sule: सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य


मुंबई |

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज मुख्यमंत्री कोण होईल? हे सांगता येणार नाही. पण आता राज्याच्या एखाद्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, असं रोहित पवार म्हणाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे आमदार रोहित पवार  यांनी अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांवर भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्यासोबतचे 18 आमदार हे शरद पवारांसोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ब्रह्मदेव आला तरीही त्यांच्यासोबतचा आमदार सोबत राहणार नाही. काकींना राज्यमंत्रीपद दिलं तर अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे, अजित पवारांना माहिती आहे, म्हणून काकींना खासदारकी दिली, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांकडे जे नेते होते त्यांना विकास कामांसाठी पैसे पाहिजे. कारवाईच्या भीतीने ते तिकडे गेले आहेत. मुलगा आणि बायको सोडून जाणार नाहीत याची खात्री दादांना असावी म्हणून त्यांनी घरात उमेदवारी दिली, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे. त्यानंतर रोहित पवारांनी जयंत पाटलांसोबतच्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

जयंत पाटील आणि रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी एकाच स्टेजवरून एकमेकांविरोधात नाव न घेता टीका करताना दिसत होते. मात्र आता रोहित पवार यांनी जयंत पाटलांसोबत कोणताच वाद नसल्याचं सांगितलं आहे. मीडियाने वेगळा अर्थ काढला असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

जयंत पाटील हे सीनियर आहेत त्यामुळे ते चांगलं काम करू शकतात. कुठलं पद कोणाला द्यायचं हे शरद पवार साहेब ठरवतील, असं रोहित पवार म्हणाले आहेत. पक्षात कोणाला घ्यायचं आणि कोणाला घेऊ नये याबाबतचा निर्णय साहेब ठरवतील. आम्ही फक्त विनंती करू शकतो. परत घेताना कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments