मी देखील लक्ष्मण हाकेंसोबत आंदोलनात उतरेन; छगन भुजबळ यांचा एल्गार


मुंबई  |

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आमरण उपोषण करत आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाकेंसोबत आंदोलनाला उतरेन असा इशारा दिला आहे.

राज्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गाला धक्का लागू नये, अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे. यानंतर आता छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी करणार असल्याचे विधान केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीआधीच जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. बिहार सरकारने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगनणा केली आहे, तसा सर्व्हे महाराष्ट्रातदेखील व्हायला पाहिजे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देता येणार नाही, हे आयोगानेच सांगितले आहे. त्यामुळे त्याला आमचा कायम विरोधच राहील. आता जातनिहाय जनगणना केली तर त्या ओबीसींसाठी फायदा होईल. जातीनिहाय जनगणना केली तर ओबीसींची संख्या आणि त्यांची परिस्थिती यांचा अंदाज येण्यास मदत होईल. केंद्र सरकारकडून एससी, एसटीला जसे वेगवेगळे फंड मिळतात, तसे फंड ओबीसींनाही मिळू शकतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींकडे राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments