प्रेमात फसवणूक, डॉक्टर तरुणीने प्रियकरावर आरोप करत केली आत्महत्या


प्रेमभंगातून टोकाचं पाऊल उचलणं, गंभीर गुन्हे घडणं पाहायला मिळतं. मध्य प्रदेशात याच कारणावरून एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेमात फसवणूक झाल्याने तिनं हे पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी युवतीनं सोशल मीडियावर सुसाइड नोट पोस्ट केली. तसंच प्रियकराचे फोटोदेखील अपलोड केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमात फसवणूक झाल्याने तिने हे पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने आठ पानी सुसाइड नोट लिहिली. त्यात प्रियकराने धोका दिल्याने कसं दुःख झालं याविषयी लिहिलं आहे. तसंच तिने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर चार पोस्ट केल्या. त्यात तीन पोस्टमध्ये पत्र शेअर केलं, तर एका पोस्टमध्ये प्रियकरासोबतचे फोटो अपलोड केले. तिनं सुसाइड नोटमध्ये लिहिलं, की 'या मूर्ख जगाचा आणि लोकांचा मी निरोप घेत आहे. प्रिय मी तुझा निरोप घेते. माझा प्राण मी तुला अर्पण करते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असं मी म्हटलं होतं. शेवटी तू मला मारून टाकलं.

मंदसौरमधल्या पिपलियामंडी नगरमध्ये राहणारी युवती डॉ. आशू मेघवाल हिच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय संतापले आहेत. संतापलेल्या कुटुंबीयांनी गुरुवारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसह युवतीचा मृतदेह हायवेवर ठेवून चक्काजाम आंदोलन केलं. कुटुंबीयांनी युवतीच्या आत्महत्येसाठी तिच्या प्रियकराला जबाबदार धरलं असून त्याला तातडीने अटक करावी आणि त्याचं घर बुलडोझरने पाडून टाकावं अशी मागणी केली आहे. कुटुंबीयांचं हे आंदोलन सुमारे एक तास सुरू होतं.

Post a Comment

0 Comments