संपत मोरे
महाराष्ट्रात सांगली हा एकमेव मतदारसंघ असा आहे की ज्या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवार लढले.आजच्या राजकीय परिस्थितीत अपक्ष उमेदवाराला लोकांचे पाठबळ मिळणे ही अशक्य गोष्ट. सांगली लोकसभा मतदारसंघात मात्र अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे दोन्हीही आघाडीच्या उमेदवारासोबत ताकदीने लढले.अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या लढतीला लोकमान्यता मिळण्यासाठी जी चार कारणे आहेत त्यातील ते क्रांतीवीर वसंतराव दादांचे नातू हे एक कारण आहेच पण अजून एक महत्वाचे कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना दिलेला पाठिंबा. बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा मिळाला आणि विशाल यांच्या अपक्ष उमेदवारीचे नैतिक बळ वाढले..बाळासाहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे विशाल पाटील यांना हत्तीचे बळ मिळाले.
आपल्या भावाला सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही हे दिल्ली काँग्रेस वर्तुळात काही काळ वावरलेल्या माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांना सर्वांच्या अगोदर समजले होते. मग त्यांनी उमेदवारी मिळाली नाही तर काय करायचे याबाबत काही रणनिती आखली. सांगली जिल्ह्यातल्या पारंपरिक विरोधकांशी संवाद सुरु केला मात्र त्याचदरम्यान त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेत सांगलीत अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली.त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रतीक पाटील यांचा आत्मविश्वास वाढला..मग पाटील बंधूनी आखड्यात उतरण्याचे जवळपास निश्चित केले.विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांची ताकद अनपेक्षित मिळाली.त्यांचा भाजपा उमेदवाराना असलेला विरोध टोकाचा आहे हेही लोकांच्या आणि विशाल पाटील यांच्या लक्षात आले..
अपक्ष म्हणून निवडणूक उभी करण्यासाठी लागणारे सगळे वातावरण विशाल पाटील यांना तयार झाले. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळं त्यांच्यासाठी खूपच पूरक गोष्टी घडत गेल्या.
या निवडणुकीत एक चित्र पहायला मिळाले. ज्या वसंतराव दादा यांनी काँग्रेससाठी आपल्या आयुष्याचा काही अनमोल काळ दिला त्या काँग्रेसचे राज्यपातळीवरचे नेते विशाल पाटील यांना अर्ज काढून घ्या असे सांगण्यासाठी सांगलीत आले.
1978 सालच्या शरद पवार यांच्या बंडानंतरही 1987 साली मतभेद विसरून आणि मनाचा मोठेपणा दाखवून वसंतराव दादांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना 'आगामी काळात शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारा 'असे आवाहन केले होते. त्या वसंतराव दादांच्या घराच्या संकटाच्या काळात पवार यांना विशाल पाटील यांची पाठराखण करत मनाचा मोठेपणा दाखवण्याची एक संधी होती, मात्र महाविकास आघाडीचे ते स्वतः सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांना विशाल यांना मदत करता आलीच नाही मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घ्यावी लागली..
याच निवडणुकीत वसंतराव दादांच्या घराण्याची चोहीकडून कोंडी होतं असताना, त्या घराला चक्रव्युहात अडकवले जात असताना बाळासाहेब आंबेडकर हे मदतीला धावले. राज्यपातळीवरच्या बाळासाहेब आंबेडकर या एकमेव नेत्यांचा खंबीर पाठिंबा विशाल पाटील यांना मिळाला.हा पाठिंबा वसंतराव दादा घराण्याला तारणारा ठरला.
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना या पक्षावर आणि नेत्यांवर वसंतदादांचे उपकार होते हा इतिहास आहे मात्र या पक्षांना दादा घराण्याच्या बाजूने भूमिका घेता आल्या नाहीत मात्र वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब हे मात्र वसंतदादांच्या नातवाच्या विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहिले.दादा घराण्यावर मोठा उपकार त्यांनी केला ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी गोष्ट आहे.सांगलीत बाळासाहेब आंबेडकरांची साथ वसंतदादा घराण्याला तारणारी ठरणार? असेच चित्र आहे.
0 Comments