“ऑडिशन चांगलं झालं, पण नंतर कॉम्प्रमाईजसाठी..”; शर्मिष्ठा राऊतने सांगितला वाईट अनुभव


मुंबई |

बॉलीवुडमध्ये कास्टिंग काऊचचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेक मोठ्या अभिनेत्रींनी याबाबत अनेकदा खुलासा देखील केलाय. अशात मराठी इंडस्ट्रीमध्येही असले प्रकार घडत असल्याचं समोर आलंय. मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने मोठा खुलासा केलाय.

शर्मिष्ठाने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेच्या निर्मिती नंतर तिनं नाच गं घुमा सिनेमाचीही स्वप्निल जोशीसोबत निर्मिती केली. हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.

तिच्या फिल्मी करिअरमध्ये तिला अनेक वाईट अनुभव आल्याचे अभिनेत्री सांगते. स्पेशल ऑडिशनबद्दल बोलताना शर्मिष्ठा म्हणाली की, “मन उधाण वाऱ्याचे या मालिकेसाठी चांगलं ऑडिशन झालं. हा माझा एक चांगला अनुभव होता. तुमच्यासाठी काही चांगलं घडायचं असेल तर ते घडून जाते. मात्र, काही वाईट अनुभव देखील असतात.”, असं अभिनेत्री म्हणाली.

पुढे बोलताना शर्मिष्ठाने सांगितलं की, “दुसरा एक वाईट अनुभव देखील आहे. ती ऑडिशन चांगली झाली होती. पण त्या प्रोडक्शन हाऊसकडून मला कॉम्प्रमाईजसाठी विचारण्यात आलं होतं. मी त्या प्रोडक्शन हाऊसचं नावही घेणार नाही, ते हिंदी आहे की, मराठी हे देखील सांगणार नाही. माझ्या सोबत हा प्रकार घडला तेव्हा मी अर्थात नकार दिला. एकवेळी काम नाही मिळालं तरी चालेल, घरी बसेन, कोणतीही नोकरी करेन, तेवढी सुशिक्षित मी आहेच, पण असलं काही जमणार नाही.”, असा अनुभव अभिनेत्री शर्मिष्ठाने कथन केला.

शर्मिष्ठा राऊत निर्मित ‘नाच गं घुमा’ चित्रपट चर्चेत
पुढे ती म्हणाली की, लोकांना असं वाटतं की, मी खूप रुड आहे, गर्विष्ठ आहे. पण मी जे काही ते बोलून टाकते, तोंडावर सांगते. असं शर्मिष्ठा राऊत म्हणाली आहे. तिची ही मुलाखत आता चर्चेत आली आहे.

दरम्यान, शर्मिष्ठाने निर्मित केलेला ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला  आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. याशिवाय ‘नाच गं घुमा’ला एकूण 6 निर्माते लाभले आहेत. स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आणि तृप्ती पाटील यांनी एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत

Post a Comment

0 Comments