भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
संघ या विचारांनी मजबूत असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे वअध्यक्ष आता त्यांची गरज संपली असे म्हणत असतील तर भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. भाजपला त्यांची गरज संपेल त्या दिवशी त्यांनी संघाबाबत जी भूमिका घेतली तीच या दोन गटांबाबत घेतली जाईल, असे शरद पवार म्हणाले.
भाजपसमोर इंडिया आघाडीचे जबरदस्त आव्हान आहे. इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत. त्यातील 15 पक्ष असे आहेत ज्यांचा लोकसभेत एकच सदस्य आहेत. त्यामुळे विचारधारा एक आहे तिथे वेगळा निर्णय कशाला घ्यायचा, त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे मत मांडले होते. वेळ आल्यावर यावर विचार करता येईल, असे याबाबत आपले मत होते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिकास्त्र सोडले. पराभवाच्या भीतीने पंतप्रधान प्रचंड घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अनेक सभा मोठ्या प्रमाणात घेतल्या. सभा घेऊन ते विकासाबाबत काहीही सांगत नाही, तर व्यक्तिगत हल्ले करतात. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून व्यक्तिगत हल्ले करणे हे योग्य नाही. त्यांनी लोकांची निराशा करण्याचं काम केले.
0 Comments