भाजपला बहुमत मिळेल. कदाचित 400 प्लसचा आकडाही पूर्ण होईल. पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल. या काही हवेतल्या बाता नाहीत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे. मोदी मॅजिकवर भाजपने सत्तेतील दहा वर्षे पूर्ण केलेली असताना 2024 ला मात्र हाच चेहरा पक्षाला नकोसा वाटायला लागलाय की काय? असा प्रश्न यामुळे तयार झालाय. भाजपचं इंटरनल पॉलिटिक्स काही का असेना, पण खरंच मोदी पंतप्रधान नसतील तर त्यांना रिप्लेस करेल असा पंतप्रधानपदाचा भाजपातील चेहरा कोण असेल? 4 जून नंतर भाजपमधील कुठला नेता आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर दिसेल? आणि या सगळ्याची नेमकी राजकीय कारण काय असतील?
अबकी बार मोदी सरकार… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची सत्ता उलथवून लावत पंतप्रधानपदावर विराजमान झाले. 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्म त्यांनी बहुमताच्या गाजवल्या. 2024 ला जेव्हा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हाच अबकी बार 400 पार असं म्हणत भाजपने पुन्हा एकदा आपण आरामात जिंकून येऊ असा मेसेज दिला. पाचव्या टप्प्यालाच आपण बहुमताचा आकडा गाठला आहे, असं म्हणत अमित शहांनी जणू सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार यावर जणू शिक्कामोर्तब केलाय… त्यामुळे असं धरून चालू की 4 जूनला भाजप देशात पुन्हा एकदा सत्तेत आलीय. मात्र यावेळेस पंतप्रधान पदाचा चेहरा हा बदललेला असेल.
भाजपने मागील दहा वर्ष मोदींच्या चेहऱ्यावर राजकारण केलं. मोदींच्या नावाने मत मागितली. 2019 ची निवडणूक तर मोदी लाटेवरच भाजपाला जिंकता आली. पण 2024 पर्यंत सगळी गणित उलटी झालीयेत. मोदी फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत चालताना दिसला नाही. याउलट मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रागाची भावना असल्याचं एकूणच देशात चित्र होतं. मणिपूर, शेतकरी आंदोलन, महागाई, स्वायत्त यंत्रणांचा चुकीचा वापर या सगळ्यांचं खापर मोदींवर फुटताना दिसलं. यामुळे भाजपने तयार केलेल्या मोदी नावाच्या ब्रँडला आता लोकं कंटाळलेली आहेत, असं चित्र संपूर्ण लोकसभेच्या प्रक्रियेत दिसून आलं. हीच गोष्ट लक्षात घेऊन भाजपला देशात लॉन्ग टर्मचं राजकारण खेळायचं असेल तर भाजप पंतप्रधान पदासाठी खांदेपालट करू शकतो. मोदींना रिप्लेसमेंट असणाऱ्या या पंतप्रधान पदांच्या चेहऱ्यांची आता भाजपमध्ये मोठी चर्चा देखील आहे.
0 Comments