ग्रामसेवकाकडून माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन, माहिती देण्यास टाळाटाळ


बार्शी |

 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून माहितीचा अधिकार कायदा करण्यात आला. मात्र, आजही माहिती देताना टाळाटाळ आणि दबाव आणण्याच्या घटना घडताना दिसून येतात. बार्शी तालुक्यातील शेलगाव (मा ) येथील राहुल रमण नलावडे यांनी २३ जानेवारी रोजी शेलगाव ग्रामपंचायतकडे रीतसर माहिती अधिकार अर्ज दाखल केला. मात्र, अपील करून अद्यापही त्यांना माहिती मिळाली नसल्याने त्यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

बार्शी तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत हद्दीत दारू विक्री करण्यासाठी एन ओ सी देण्यात आलेली आहे का? जर ही एन ओ सी दिलेली असेल तर ती एन ओ सी देण्याबाबत जो ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्या ग्रामसभेचा ठराव, व प्रोसुडींग मिळावे. तसेच शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाणिज्य, औद्योगिक आस्थापना आहेत, त्या आस्थापनाकडून जी कर आकारणी केली जाते ती आकारणी कोणत्या आर्थिक निकषावर केली आहे याबाबत माहिती मागितली आहे. तसेच वित्त आयोग खर्चाचे बँक स्टेटमेंट इत्यादीही माहिती स्वरूपात मागितले आहे. 


सदर माहिती पोस्टाने मुदतीत मिळाली नाही म्हणून नलावडे यांनी पंचायत समिती बार्शी यांचेकडे अपील अर्ज दाखल केला. वास्तविक पाहता सदर माहिती ही सार्वजनिक स्वरूपाची आहे त्यामुळे ही माहिती मुदतीत मिळणे अपेक्षित होतं, याशिवाय ही सर्व माहिती पोस्टाने दिली जावी, अशी मागणी असतानाही मला कार्यालयात बोलावून दबाव टाकण्यात येत असल्याचे RTI वापरकर्ते राहुल नलावडे यांनी म्हटले. 

दरम्यान, अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत असेल तर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घातले पाहिजे, जिल्हा परिषद सीओ मॅडम यांनी योग्य ती कारवाई करून नलावडे यांना लवकरात लवकर माहिती मिळवून दिली पाहिजे. कायद्याचा धाक आणि अधिकार लोकशाहीत जिवंत आहे, हे सर्वांनाच दाखवून दिलं पाहिजे.

Post a Comment

0 Comments