कृष्णराज बारबोलेंची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी निवडबार्शी - 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बार्शीतील राष्ट्रवादीचे नेते विश्वास बारबोले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आपण शरद पवार यांच्यासमवेतच राहणार असल्याचं बारबोले यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आता बार्शीचे माजी उपनगराध्यक्ष आणि युवा नेते कृष्णराज बारबोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, बार्शीच्या खांद्यावर राज्याची धुरा आली आहे, असेच म्हणता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यांनंतर निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्यानंतर, शरद हेच राष्ट्रवादी असल्याचं सांगत शरद पवार गटाने पुन्हा नव्याने लढाई सुरू करण्याचे निश्चित केले. त्यासाठी, 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' या नावाने पक्षबांधणी सुरू केली आहे. या राष्ट्रवादीत बार्शीला राज्याची जबाबदारी देण्यात आली असून राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी युवा नेते कृष्णराज बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सहीचे पत्र देण्यात आले आहे. कृष्णराज यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र स्वीकारले. यावेळी, प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उपस्थित होते. तसेच बार्शीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी किरण देशमुख, महेश चव्हाण, विक्रमसिंह पवार आणि केतन पुनमिया हेही उपस्थित होते.

महाराष्ट्राचा युवक साहेबांसोबत - कृष्णराज बारबोले

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर आज महाराष्ट्रातील तरुण चालतोय. महाराष्ट्राचा युवक साहेबांसोबतच आहे. त्यामुळे, साहेबांच्या विचारांचा वारसा आता राज्यभर पसरवण्याची संधी मला मिळाली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हाच खरा पक्ष असून तरुणाईच्या साथीने आम्ही आगामी निवडणुकांत हे सिद्ध करून दाखवू, असे कृष्णराज बारबोले यांनी निवडीनंतर बोलताना म्हटले.


Post a Comment

0 Comments