करमाळा |
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहीनी टाकण्याचे काम सुरू आहे.परंतू या कामाला गती नसल्यामुळे योजनेचे काम मागील अनेक वर्षे रखडले आहे.परिणामी सोलापूर शहराला वर्षातून दोन ते तीन वेळा भीमानदीद्वारे पिण्यासाठी पाणी सोडावे लागत आहे.त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यामुळे कामास गती देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या कडे केली आहे.
बागल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुणे जिल्ह्यातील पडलेल्या पावसामुळे अपवाद वगळता उजनी धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते.परंतु यावर्षी कमी पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली नाही.उजनीत अल्प प्रमाणात पाणी साठा असताना जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर शहरासाठी पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले.त्यामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात आणखी घट होणार असून प्रशासनाच्या अयोग्य नियोजनाचा फटका उजनी पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रातील शेतकर्यांना बसणार आहे.परिनामी ऐन हिवाळ्या पिके जगविण्यासाठी शेतकर्यांना संघर्ष करावा लागणार आहे.
सोलापूर शहराला वर्ष भरात २ टीएमसी पाण्याची गरज लागते परंतु प्रत्यक्षात धरणातून नदीद्वारे २० ते २२ टीएमसी पाणी सोडावे लागते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.परिणामी धरण भरुनही पाणी पातळीत घट होऊन मृत साठ्यात जाते.याचा फटका उजनी पाणलोट क्षेत्रातील करमाळा,पुणे जिल्ह्यातील इंदापूर तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकर्याना पिके जगवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.पाणी पातळीत घट झाल्याने मासेमारी व्यवसाय ही धोक्यात येतो.त्यामूळे प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करता जलवाहीनी टाकण्याच्या कामाला गती देउन सोलापूर शहराला बंद नलिकेद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी बागल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments