माढा | केवळ चारशे रुपड्यासाठी महिलेनेच महिलेला जाळून मारले


सोलापूर |

 चारशे रूपयांसाठी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रकार माढा तालुक्यातील पडसाळी येथे घडला. हे कृत्य दोन महिलांनीच केले आहे. जखमी व आरोपी महिला पारधी समाजाच्या आहेत. घटनेनंतर दुचाकीवरून हे तिघेही पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यात शोलेबाई गंभीर भाजून जखमी झाली. तिला सोलापुरात एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून ती मृत्युशय्येवर आहे. शोलेबाई समिंदर काळे (वय ४०, रा. भेंड, ता. माढा) असे या घटनेत गंभीर भाजून जखमी झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिने दिलेल्या मृत्युपूर्व जबाब तथा फिर्यादीनुसार मीना संजय काळे (वय २८) व मंगल पवार (वय ३१) आणि त्यांचा साथीदार दीपक पाटील (वय ३५, तिघे रा. पडसाळी) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या विरूद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

जखमी शोलेबाई काळे हिने आपल्या नात्यातील मीना काळे हिच्याकडून चारशे रूपये उसने घेतले होते. ही रक्कम मागण्यासाठी मीना काळे हिने शोलेबाईला पडसाळी गावात बोलावून घेतले होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान कडाक्याच्या भांडणात झाले. परंतु मीना काळे व मंगल पवार यांनी तिला जिवंत जाळण्याचा डाव रचला होता. मीना काळे हिने सोबत पेट्रोल भरून बाटली आणली होती. तिने बाटलीतील पेट्रोल शोलेबाईच्या अंगावर ओतले. तर मंगल पवार हिने काडीपेटीने काडी पेटवून टाकली. यावेळी त्यांचा साथीदार दीपक पाटील हा, चिथावणी देत होता.

Post a Comment

0 Comments