सोलापूर : सोलापुरातील माजी आमदार रविकांत पाटील यांचा मुलगा विराज यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेत्री तरुणीवर अत्याचार करुन तिच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकाविल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. विराज रविकांत पाटील, (रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) असे गुन्हा दाखल आमदार पुत्राचे नाव आहे. टिंगरे नगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात याबाबत शुक्रवारी (२६ जानेवारी) तक्रार दिली आहे.
हा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडल्याची फिर्यादीत म्हटलंय. शारीरिक संबंध ठेवून लग्नाचा विषय काढल्यावर विराज हे तरुणीला टाळू लागले. त्यामुळे तक्रारदार तरुणीने त्याची विचारणा केली. त्यानंतर विराज पाटील यांनी तिला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याकडे असलेले पिस्तूल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तु जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो, मी कोण आहे? अशी धमकी देत धक्काबुक्की केली, असे तक्रारीत म्हटले आहे. विराज पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. माजी आमदार रविकांत पाटील यांचे विराज हे चिरंजीव आहेत. पाटील हे कर्नाटक मधील इंडी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तक्रारदार तरुणी अभिनेत्री आहे. आरोपी आणि या तरुणीची ओळख फेसबुकवर झाली. विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
0 Comments