मुंबई |
देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग सुरू झाला आहे. कोविड असताना देखील काम केले योग्य वेळेत काम पूर्ण झाले, आता २० मिनिटात रायगड जिल्ह्यात पोहचू शकतो. त्यामुळे इंधन आणि वेळ वाचेल असे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
शिवडी-न्हावा शेवा तथा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) या सहा मार्गिकांच्या समुद्रावरील भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे, हा पूल अटलजींच्या नावाप्रमाणेच मजबूत आहे. पूज्य अटलजींचे नाव आणि आपले दिग्गज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबुतीची हमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु असून आपल्याकडून जे प्रस्ताव केंद्रात जातात, ते मंजूर होतात, महाराष्ट्राची विश्वासार्हता वाढत असून गुंतवणुकदारांचा देखील गुंतवणुकीसाठी प्रतिसाद वाढला आहे. राज्यात सुमारे 8 लाख 35 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रगती करत आहे. गेल्या नऊ वर्षांत आपण अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांशी लढत आहेत, तर आपला भारत मजबूत आणि संतुलित नेतृत्वामुळे आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा असून अटल सेतूचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धन्यवाद दिले.
0 Comments