लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या नाकावर जोरात ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट या उच्चभ्रू सोसायटीत शुक्रवारी घडली.
निखिल पुष्पराज खन्ना (वय ३६, रा. वानवडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पत्नी रेणुका खन्ना (वय ३६, रा. वानवडी) हिला संशयावरून ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका आणि निखिल यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.निखिल घरी आई-वडील आणि पत्नीसमवेत राहत होते. पतीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिली नाही. तसेच, पत्नीचा दुबईत वाढदिवस साजरा केला नाही, या कारणावरून शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात रेणुकाने निखिल यांच्या नाकावर ठोसा मारला. त्यात नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन बराच रक्तस्राव झाला.
त्यानंतर रेणुकाने सासरे डॉ. पुष्पराज खन्ना यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. डॉ. खन्ना तातडीने घरी पोहोचले. तपासणी करून निखिलला ‘सीपीआर’ देण्याचा प्रयत्न केला, परंतु निखिल यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसांना हा प्रकार कळवला गेला.निखिल यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी निखिल यांना मृत घोषित केले.
0 Comments