सोलापुरात गणेश मंडळापुढे सचिन तेंडुलकरसाठी भिकपेठी


सोलापूर |

सचिन तेंडुलकर याने रमीची जाहिरात केल्याच्या विरोधात सोलापुरातील अकोलेकाटी गावातील गणपती मंडळपुढे चक्क भीकपेटी ठेवण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू  यांनी या मंडळाला भेट देत गणरायाची पूजा केली. त्यानंतर या पेटीत स्वतः 100 रुपये टाकत सचिन तेंडुलकरवर टीका केली. महाराष्ट्रातील प्रहार संघटनेच्या विचारांचे जितके गणेश मंडळ आहेत तिथे अशा भीक पेटी ठेवल्या जातील. यात जमा होणारे पैसे विसर्जन झाल्यानंतर तेंडुलकर यांच्या घरी पोहचवू अशा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

सचिन तेंडुलकर यांने जंगली रमी या ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी त्याला विरोध केला आहे. त्याविरोधात त्यांनी सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील  घराबाहेर आंदोलनही केलं होतं. ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. कित्येक उदाहरणं आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या झाल्यात, हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतरत्न असूनही अशा गोष्टीची जाहीरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया या आधी बच्चू कडू यांनी दिली होती. आम्हाला क्रिकेटपटू म्हणून त्यांचा अभिमान आहे, पण भारतरत्न म्हणून जर ते अशा जाहीराती करत असतील तर ते मात्र मान्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.

Post a Comment

0 Comments