मुंबई |
मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तब्बल 17 दिवस उपोषण केलं. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीवरुन अनेक घडामोडी घडल्या. ज्यांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये कुणबी असा उल्लेख असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तसेच सरकारने निजामकालीन कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समितीदेखील स्थापन केलीय. या समितीने काही लाख अभिलेखांची पडताळणी केलीय. यामध्ये फक्त 5 हजार कागदपत्रांमध्ये कुणबी असा उल्लेख आढळला आहे.
ओबीसी समाजाच्या नेत्यांची आज राज्य सरकारसोबत सह्यादी अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला सकसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती ओबीसी नेत्यांनी दिली.
0 Comments