तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक


धाराशिव |

 तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना येरमाळा पोलीसांनी  पंढरपुर येथे अटक केली होती. या प्रकरणी जमीन मंजूर होताच, पोलिसांनी   फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २८ ऑगस्ट सोमवार पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांनी जुन्याच झालेल्या कामावर नव्याने एक कोटी निधी आणल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतने हा निधी रद्द करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीला पत्र देवुन निधी रद्द केला होता. सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून गावातील सुंदर लोमटे यांनी येरमाळा पोलिसात तक्रार केली होती.

चौकशीत पोलिसांनी तपास करुन अहवाल पंचायत समितीला सादर केला होता.सदर अहवालात ठरावातील सूचक,अनुमोदक,ग्राम सेवक,सरपंच यांच्या केलेल्या चौकशीत लोमटे महाराजांनी कागद पत्रांचा गैर वापर केल्याचे सांगूनही पंचायत समितीचे चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी टी.जे.जाधव यांच्या फिर्यादीवरून सरपंच,रुक्मिणी आगतराव घोळवे व ग्रामसेवक दीपक वेदपाठक यांच्यावर बनावट कागदपत्र,सही,शिक्के,बनावट ठराव तयार केल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.पंचायत समितीच्या चौकशी अहवालात सदरील प्रकार एकनाथ लोमटे महाराजांनी केल्याचे जबाब असूनही गट विकास अधिकारी यांनी लोमटे महाराजांना अभय दिले होते मात्र अखेर तपास करुन त्यांना अटक केली आहे.

कळंब तालुक्यातील मलकापूर येथे  एकनाथ लोमटे  महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे . 28 जुलै 2022 रोजी मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे सर्वेसर्वा स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात बसली असता महाराजांनी महिलेस प्रवचन हॉलच्या खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. लोमटे महाराजांनी आपणावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने करूनही येरमाळा पोलिसांनी  विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयाने चपराक देताच, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि पंढरपूर येथे अटक केली होती. त्या गुन्ह्यात जामीन  होताच, पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्हयात अटक केली आहे. 
 


Post a Comment

0 Comments